पंढरपूर आगाराला ई बस मिळाव्यात- ग्राहक पंचायतीची मागणी
पंढरपूर – प्रतिनिधी
पंढरपूर आगाराला ई बसेस मिळाव्यात अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे प्रवाशी राजा दिनात करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सूचना तक्रारी समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिवस हा उपक्रम घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे पंढरपूर आगारात प्रवासी राजा दिवस या उपक्रमाचा शुभारंभ ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील होते. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये उपस्थित होते. प्रारंभी आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगून सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी पंढरपूर आगारात या उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल ग्राहक पंचायतीचे वतीने अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्राहक पंचायतीतर्फे निवेदन देण्यात आले त्यामध्ये खालील प्रमाणे समस्या,सुचना, मागण्यांचा समावेश आहे. पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र असुन, संपूर्ण राज्यातून भाविक पर्यटक येथे येत असतात तथापि या आगारास अनेक वर्षांपासून नवीन बसगाड्या मिळालेल्या नाहीत, आहेत त्या गाड्या तंदुरुस्त नाहीत त्यामुळे मार्गावर बंद पडण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे.पंढरपूर बस स्थानकावरील स्वच्छता गृह फलाटापासून दूर असल्याने प्रवाशांना मोकळ्या मैदानाचा वापर करावा लागतो विशेषतः महिलांची फार कुचंबणा होते.बस गाड्यांची,फलाटांची स्वच्छता याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच रिझर्वेशन ऑफिसची वेळ पहाटे पाच ते रात्री दहा करावी. त्याचप्रमाणेपंढरपूर ते पुणे जाणाऱ्या काही गाड्या नविन कराड नाका, लिंक रोड,कॉलेज चौक यामार्गेसोडाव्यात. दुपारी चार नंतरच्या पंढरपूर ते पुणे जाणऱ्या काही बसेस करकंब,टेंभुर्णी,इंदापूर यामार्गे सुरू कराव्यात. पंढरपूर ते तुळजापूर, धाराशिव अशी बससेवा मोहोळ, नरखेड,वैराग,गौडगाव यामार्गे नवीन सुरू करावी. पंढरपूर ते श्रीक्षेत्र नीरा नृसिंहपूर अशी श्रीपूर, संगम या मार्गावर बस सुरू करण्यात यावी. बंद केलेली पंढरपूर ते सोलापूर विनाथांबा बससेवा सुरू करावी. डीजी लॉकरमधील ओळखपत्रे सवलतीसाठी ग्राह्य धरण्याबाबत चालक वाहकांना सक्त सूचना देण्यात यावी. बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ व अतिक्रमणमुक्त असावे. या जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल अशी अपेक्षा जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी व्यक्त केली. यावेळी प्रवासी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रवाशी राजा दिना निमित्ताने इतरही अनेक निवेदने देण्यात आली आहेत.सदर कार्यक्रमास विभागीय वाहतूक अधिकारी श्री.अजय पाटील यांनी प्रवाशी बंधू भगिनींच्या तक्रारी ऐकून घेवून त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विभागीय वाहतूक अधिक्षक नकाते,आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत, वाहतूक निरीक्षक नवनाथ दळवे उपस्थित होते.या उपक्रमासाठी वरिष्ठ लिपिक सुमित भिंगे,वाहतूक लिपिक समाधान मेटकरी यांनी परिश्रम घेतले.