सामाजिक

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटन हेच कार्यकर्त्यांचे कवचकुंडल

24 मराठी न्यूज सोलापूर जिल्हा, प्रतिनिधी, प्रकाश इंगोले, पंढरपूर

प्रांताध्यक्ष मा.धनंजय गायकवाड यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सोलापूरच्या जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी नियुक्तीसाठी प्रांताध्यक्ष मा. धनंजय गायकवाड व प्रांत संघटक मा.बाळासाहेब औटी यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. त्यानिमित्त पंढरपूर येथे जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपक इरकल यांनी संघटन मंत्र व ग्राहक गीताने केली.सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विनय उपाध्ये यांनी केले यानंतर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व देशपातळीवरील तसेच महाराष्ट्रातील व अखिल भारतीय ग्राहक पंचायत परिवारातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री विनोद भरते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर द्वारा विद्यावाचस्पती पदवी मिळवल्याबद्दल सौ मैत्रेयी केसकर व श्री प्रशांत ठाकरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थित सर्व तालुका अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.
यानंतर प्रांत संघटक श्री बाळासाहेब औटी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेला परमेश्वराच्या रूपात पाहावे,तसेच स्वामी विवेकानंदांचा आदर्श सर्वांनी ठेवावा,कोविड आपत्ती संपल्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये तसेच जिल्हा स्तरावर अभ्यास वर्गांचे आयोजन व्हावे,तसेच जिल्हा कार्यकारिणीने सर्व तालुक्यांचा प्रवास करावा,स्व. बिंदुमाधव जोशी यांचा गाव तिथे ग्राहक पंचायत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कार्य केले पाहिजे.प्रांत स्तरावरून निश्चित केलेल्या संहितेप्रमाणे कामकाज व्हावे,प्रशासनाशी पत्रव्यवहार वाढवावा, महाराष्ट्रातील संत तसेच छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांना एकत्रित करून संघटन वाढवावे,मार्गदर्शन सेवा केंद्र ही जीवन मार्गदर्शन केंद्र व्हावित,तसेच सर्वांनी सदस्यता नोंदणी करून प्रशासनाची संपर्क वाढवून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी भावना व्यक्त केली.
दुपार सत्रामध्ये श्री शशिकांत हरिदास यांनी सोलापूर जिल्ह्याच्या कार्याचा अहवाल सादर केला व प्रांत कार्यकारणीकडून जिल्ह्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.त्यानंतर प्रांताध्यक्ष श्री धनंजय गायकवाड यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून श्री शशिकांत हरिदास तसेच जिल्हा संघटक म्हणून श्री दीपक इरकल यांची प्रांताच्या वतीने नियुक्ती जाहीर केली, तसेच श्री विनोद भरते यांची प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर केली व प्रांत कार्यकारणीच्या वतीने त्यांचा सन्मान केला. या नियुक्तीनंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष आणि संघटक यांची नियुक्ती जाहीर केली.
यानंतर जेष्ठ प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री सुभाष सरदेशमुख यांनी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व सर्वांनी एकत्रितपणे काम करून समाजातील प्रश्‍न सोडवावेत व संघटन वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी राष्ट्रीय कार्यकारणी व मध्य महाराष्ट्र प्रांताने निश्चित केलेल्या ध्येयधोरणांचा नुसार जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. एक कार्यकर्ता एक जबाबदारी दिल्यामुळे संघटन अधिक मजबूत होईल तसेच प्रत्येक नियुक्ती ही तीन वर्षाची असेल असे जाहीर केले. नियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये अहंकार निर्माण होऊ नये, प्रतिष्ठेसाठी पद नसून ती एक जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले पदाची जबाबदारी स्वीकारताना संघटनेची ध्येयधोरण सर्वांनी पाळावीत तसेच प्रांताने निश्चित केलेल्या रचनेप्रमाणे काम व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक कार्यकारणीत जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित विचारविनिमय करून समाजातील प्रश्‍न सोडवावेत ,ठराविक कालावधीनंतर होणारे बदल संघटनेला तसेच कार्यकर्त्यांना उर्जा देतात, अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही नैतिक ताकद असलेले संघटना आहे, समाज आज चांगल्या कार्यकर्त्यांच्या शोधात आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जागृती निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली .शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत हे व्यासपीठ आहे, गुणवंत कार्यकर्त्यांची गुणवत्ता महाराष्ट्रासाठी उपयोगी व्हावी व कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवावा.हे करत असताना संघटन हेच प्रत्येक कार्यकर्त्याचे कवचकुंडल आहे याची जाणीव ठेवावी असे प्रतिपादन केले. कोणाही एकाला महत्त्व देण्यापेक्षा एकीला महत्त्व द्यावे असेही सांगितले. भविष्यकाळात होणारे प्रांत अधिवेशन हे संघटनेचे विराट रूप समाज व प्रशासनाला समजावे यासाठी आहे, ज्यामुळे संघटनेची आणि कार्यकर्त्यांची ताकद दिसून येईल. मध्य महाराष्ट्र प्रांताने कामकाजामध्ये सुलभता येण्यासाठी तसेच समाजाला भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास व्हावा यासाठी विषय समित्यांचे रचना केली आहे. प्रत्येक विषय समितीने आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून शासन तसेच प्रशासनाला लोकहितकारी निर्णय घेण्यास भाग पाडावे. ग्राहक चळवळ ही व्यवस्था सुधारणारी चळवळ आहे, त्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्ते आवश्यक आहेत, ज्यांचा वचक प्रशासनावर राहील. प्रत्येक तालुक्यातील ग्राहक पंचायतीच्या समूहांमध्ये येण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे .ग्राहक पंचायतीचा कार्यकर्त्याने समाजामध्ये आपल्या कार्याने प्रतिष्ठा प्राप्त केली पाहिजे असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सोलापूर जिल्ह्याने ग्राहक चळवळीसाठी दिलेल्या योगदानाचा आदराने उल्लेख केला. तसेच बैठकीच्या उत्तम नियोजनाबद्दल सर्व व्यवस्थेतील कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदनही केले.
या बैठकीसाठी पंढरपूर केमिस्ट असोसिएशनने सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. श्री महेश भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सौ मैत्रेयी केसकर ,सौ सारिका भरते ,सौ मंदा हरिदास यांनी पसायदान रूपाने बैठकीचा अध्यात्मिक समारोप केला. तसेच विसर्जन मंत्राने कार्यक्रमाचा औपचारिक समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर हे आवर्जून उपस्थित होते व त्यांच्याही मार्गदर्शनाचा लाभ सोलापूर जिल्ह्याला झाला संतोष नेहरकर यांनीसुद्धा समाधान व्यक्त केले. तसेच
प्रसिद्ध वृत्तपत्र लेखक राजुभाई मुलाणी, महावितरणचे निवृत्त अधिक्षक अभियंता संभाजी लंगोटे,केमिस्ट असो.अध्यक्ष प्रशांत खलीपे यांनी ग्राहक चळवळीबद्दल आदर व्यक्त केला आणि भविष्यात ग्राहक पंचायतीमध्ये सहभागी होऊन पूर्ण सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. जिल्हा सचिव सुहास निकते यांनी कार्यक्रमातील व्यवस्थांचे उत्तम नियोजन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील माजी अध्यक्ष अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापुरकर ,आझाद अल्लापुरकर, धनंजय पंधे, ,श्रीराम साळुंखे, गजानन काकरंबे, शुभम टकले, गणेश मेटकरी, दिलीप पाठक, संजय खंडेलवाल, कुमार हरिदास, पांडुरंग काटवटे,दयानंद शिंदे, रामदास डोंगरे ,संजय ढोबळे यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक इरकल यांनी केले

Date-25-02-2022
संपादक,

/ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!