विशेष

दोनशे पशुपक्ष्यांचा आवाज काढणारा हिंगोलीचा अवलिया,

हुबेहूब आवाजामुळे जंगलातील प्राण्यांशी त्याची चांगली गट्टी जमली

24 मराठी न्यूज नेटवर्क

हिंगोली – जिल्ह्यातील कलगाव येथील सुमेध बौधी गंगाराम वाघमारे हा दोनशे पशु-पक्ष्यांचे आवाज काढतो. पशु-पक्ष्यांच्या हुबेहूब आवाजामुळे जंगलातील प्राण्यांशी त्याची चांगली गट्टी जमली आहे. हा युवक सध्या चंद्रपूरच्या ताडोबा नॅशनल पार्कमध्ये निसर्ग-अभ्यासक म्हणून काम करीत आहे चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, निर्माते नागराज मंजुळे यांच्यासोबत एक तरुण विविध पक्षी, प्राण्यांचे आवाज काढत असतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत आला होता. साधे राहणीमान असलेला हा तरुण कोण, कुठला असे प्रश्न तो व्हिडीओ पाहणार्‍या प्रत्येकाच्या मनात उपस्थित झाले. दोनशेपेक्षा अधिक पक्षी-प्राण्यांचे आवाज हुबेहूब काढणारा तरुण कोणत्या मोठ्या शहरातील नसून, तो हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील आहे. त्यास लहानपणापासूनच पक्षी, प्राण्यांची प्रचंड आवड होती. वेगवेेगळे पक्षी, प्राण्यांचे आवाज काढण्याचा प्रयत्न करणार्‍या सुमेध बौधीला हळूहळू हुबेहूब आवाज काढणे जमू लागले आणि त्याची ओळख निसर्ग-मार्गदर्शक, निसर्गप्रेमी अशी झाली. पक्षी, प्राण्यांचे आवाज काढणे ही मोठी देण निसर्गदत्त आहे. सुमेध बौधीला दोनशेहून अधिक पक्षी, प्राण्यांचा आवाज हुबेहूब काढता येतो. त्याने काढलेला आवाज ऐकताच पक्षी-प्राणी आपलाच सखा बोलावतोय म्हणून जवळ येऊ लागतात आणि त्याला गराडा घालतात.ताडोबा नॅशनल पार्कमध्ये निसर्ग मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या सुमेध बौधीचा वन विभागाच्या वतीने अनेकदा गौरव करण्यात आला आहे. शेतशिवारात फिरताना पशु, पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची सवयच त्याला जडली होती. यातूनच तो मोर, पोपट, कावळा, कोकिळा, भारद्वाज, बुलबूल, कोंबडा, कोंबडी, चिमणी, साळुंकी, कोतवाल, धनेश, सुतार, घुबड, कबुतर, पारवा आदी पक्ष्यांसह बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळी, बेडूक, कोल्हा, कुत्रा, घोडा, मांजर, उंदीर या प्राण्यांसह डासांचाही हुबेहूब आवाज काढतो.सुमेधबौधीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सांगली येथे झाले. भूगोल विषयात त्याने एम. ए. केले असून, ’ताडोबा येथे अभ्यासक म्हणून काम करताना त्याने तेथील प्राण्यांचे आवाज आत्मसात केले. आपले वडील गंगाराम हे मुंग्यांना साखर देत असत, याबाबत मी त्यांना विचारले असता त्यांनी ’जीवन जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे,’ असे सांगितले. तेव्हापासून पक्षी, प्राण्यांच्या संगतीत राहण्याची आवड निर्माण झाली, असे तो म्हणाला.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांच्या काळात सर्वत्र वृक्षांचे नव्हे तर सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. हे सिमेंटचे जंगल ऑक्सिजन देणारे नसून, त्यासाठी आपल्याला वृक्षलागवड, निसर्गाची जोपासना करणे गरजेचे आहे. चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेत वृक्ष, पक्षी, प्राण्यांसाठी काम करण्याचे निश्चित केले असून, पुढील काळात निसर्ग वाचविण्याचा संदेश देणार असल्याचे सुमेधबौधी याने सांगितले.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧- lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!