व्यंग चित्र आणि मी अर्थात जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
श्याम सावजी .. पंढरपूर
24 मराठी न्यूज नेटवर्क
आज जागतिक व्यंग चित्रकार दिवस . त्यानिमित्ताने माझ्या व्यंग चित्रकला प्रवासाचा हा उजाळा. माझ्या लहानपणी आमच्या घरी फिरत्या वाचनालयाचे गौरवार हे गृहस्थ पुस्तके आणून द्यायचे हे मी या पूर्वीच तुम्हाला सांगितले आहे. त्या पुस्तकात काही मासिके असायची . जुने दिवाळी अंक असायचे. त्या मासिकात , दिवाळी अंकात व्यंग चित्रे असायची . खूप आनंदाने मी ती व्यंगचित्रे बघायचो. सर्व श्री मा. बाळासाहेब ठाकरे , श्याम जोशी , अनिल सोनार , वसंत सरवाटे , संजय मिस्त्री , हरीश्चंद्र लचके, प्रभाकर झळके , प्रशांत कुलकर्णी , मंगेश तेंडूलकर , अभिमन्यू कुलकर्णी अश्या नामांकित व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मी बघत आलो. बाळासाहेबांची व्यंग चित्रे अजून माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत . त्यापैकी “ तुझे रूप चित्ती राहो , मुखी तुझे नाम ” या गीताच्या कडव्यांवर त्यांनी रेखाटलेली इंदिरा गांधी आणि त्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या मंडळींची खिल्ली उडवणारी व्यंगचित्र मालिका अजूनही मला स्पष्ट आठवत आहे . काही व्यंग चित्रकारांची व्यंग चित्रे खूप साधी सोपी असत , त्यात रेखाटनाचं फारसं कौशल्य नसे मात्र त्यातला आशय मोठा असे किंवा व्यक्तिरेखा अश्या भन्नाट रेखाटलेल्या असत कि फस्स्स करून हसू तोंडावाटे बाहेर पडत असे. या गोष्टीला व्यंग चित्र म्हणतात हे मला त्यावेळी समजत नसे . एक विनोदी चित्र म्हणून मी त्याकडे बघत असे. अशी विनोदी हास्य चित्रे रेखाटायाला मी सातवी आठवी पासून सुरुवात केली मात्र त्याला विषयाची जोड द्यायला मला जमत नसे . ते कौशल्य महाविद्यालयीन दिवसात मला जमायला लागलं. साधारण द्वितीय वर्षाला असताना मी व्यंग चित्रे काढून महाविद्यालयाच्या भित्ती पत्रकात लावायला लागलो. या कामी मला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचे आणि माझ्या मित्रांचे खूप सहकार्य लाभले. नंतर नंतर मी स्थानिक तसेच जिल्ह्यातील काही वृत्तपत्रांना व्यंगचित्रे द्यायला सुरुवात केली. व्यंगचित्र छापून आल्यावर मनाला खूप आनंद व्हायचा. मात्र बरेचदा माझ्या व्यंग चित्राखालचा मजकूर बदलला जायचा . मानधन हा प्रकार नव्हता पण व्यंग चित्राखाली नावही बरेचदा नसायचं . मग मी वृत्तपत्रांना व्यंग चित्रे देणं थांबवलं. काही वर्षे दिवाळी अंकांसाठीही मी व्यंग चित्रे रेखाटली. फेसबुक वर आल्यानंतर माझ्या व्यंग चित्र रेखाटनाला जोर आला. मंत्रालयाला आग लागली त्या संदर्भातील व्यंग चित्र मी पहिल्यांदा फेस बुक वर पोस्ट केलं. त्या व्यंग चित्राला जवळपास ७०० शेअर मिळाल्या . रसिक मित्रांच्या प्रतिक्रिया आणि लाईक मुळे उत्साह वाढला. त्यानंतर गेल्या चार पाच वर्षात मी जवळपास हजार व्यंग चित्रे पोस्ट केलीत . अजूनही हा प्रवास सुरु आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेछा आहेतच . धन्यवाद … श्याम सावजी .. पंढरपूर
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com