स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला युजीसी कडून स्वायत्तता (ऑटोनॉमस) दर्जा प्रदान !
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट तथा स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरला देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला ‘स्वायत्त’ दर्जा अर्थात ‘ऑटोनॉमस दर्जा’ प्राप्त झाला आहे. हा दर्जा शै. वर्ष २०२४-२०२५ पासून शै. वर्ष २०३३-२०३४ अशा एकूण दहा वर्षांसाठी असणार आहे. युजीसी (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून तसे पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे.’अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.अलीकडेच ‘नॅक’च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ ही ग्रेड दिलेली होती. ही ग्रेड देण्याच्या अनुषंगाने त्यांनी महाविद्यालयातील सर्व पायाभूत शैक्षणिक व भौतिक सुविधा, अध्ययन-अध्यापन पद्धती, विद्यार्थी पूरक सुविधा, महाविद्यालयाची शैक्षणिक उद्दीष्टे, अभ्यासक्रमाचा दर्जा व त्याची काटेकोर अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, कॅम्पस प्लेसमेंट, संशोधन तसेच यापूर्वी मिळालेल्या मानांकनापासून ते आतापर्यंत महाविद्यालयाने केलेली प्रगती व इतर महत्वपूर्ण बाबींची शहानिशा केली होती. ४ पैकी ३.४६ एवढ्या स्कोअर सह ‘ए प्लस’ ग्रेड मिळवणारे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. एखाद्या महाविद्यालयास ‘ऑटोनॉमस’ दर्जा प्राप्त होण्यासाठी नॅक कडून किमान ‘ए’ ही ग्रेड मिळणे आवश्यक असते ‘नॅक’चे ‘ए प्लस’ मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीमधील शिक्षणाच्या दर्जावर शिक्कामोर्तब झाले होते. या पूर्वी महाविद्यालयाला नॅकचे एकदा तर महाविद्यालयातील पात्र अभ्यासक्रमांना ‘एनबीए’ चे दोनदा मानांकन मिळालेले आहे तसेच एन.आय.आर. एफ या राष्ट्रीय पातळीवरील रँकिंग मध्ये १५१- ३०० च्या बँड मध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ने स्थान मिळवले आहे. नुकत्याच मिळालेल्या या स्वायत्ततेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या उच्च शैक्षणिक दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे तसेच या दर्जामुळे विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम ठरवणे, परिणामकारक परीक्षा पद्धती राबवणे आदी बाबतीत महाविद्यालयास स्वायत्तता प्राप्त होणार आहे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला हा दर्जा मिळण्यामध्ये स्वेरीत वापरल्या जाणाऱ्या ‘आर-वर्क’ या ईआरपी प्रणालीचा सिंहाचा वाटा आहे. ‘नॅक’ साठी आवश्यक असणारे सर्व विभागांचे सर्व रिपोर्ट्स या प्रणालीच्या माध्यमातून लीलया पद्धतीने तयार होतात आणि सर्व माहितीचे संकलन एकाच ठिकाणी होत असल्याने महाविद्यालयांना या प्रणालीचा खूपच मोलाचा फायदा होतो भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून ‘स्वेरी’ मध्ये ‘ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्र’ (आर.एच.आर.डी. एफ.) ची निर्मिती ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून पुढे समाजोपयोगी आणि ग्रामीण उद्योजकता वाढविण्याच्या हेतूने तसेच उपयोगी तंत्रज्ञान ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’च्या माध्यमातून स्वेरीमध्ये उत्तम दर्जाची व हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात आली. सन २०१६, २०१८ व २०२० व २०२२ या चार वर्षी ‘टेक्नो-सोसायटल’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून समाजाशी निगडित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाला चालना मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. आजपर्यंत जवळपास ३३ संशोधन प्रकल्पांमधून सुमारे ४४.३४ कोटी इतका संयुक्त संशोधन निधी महाविद्यालयास मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून ‘स्वेरी’ मध्ये विविध अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग लॅब, चेन टेस्टिंग लॅब, व्हायब्रेशन अनालिसिस लॅब, एन.डी. टी. लॅब, लोडींग फ्रेम फॅसिलिटी, ऍडव्हान्स्ड डिझाइन अँड सिम्युलेशन लॅब, अँटेना डिझाइन लॅब इ. चा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे ३५ संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या बौद्धिक विकासास आणि तांत्रिक कौशल्य वाढीस चालना मिळत आहे. ‘स्वेरी’तील एकूण ३२ प्राध्यापक पीएच.डी. धारक असून आणखी २८ प्राध्यापक पीएच.डी. पुर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी असणाऱ्या संशोधनपूरक वातावरणामुळे आणि प्रोत्साहनपर धोरणामुळे गेल्या पाच वर्षात ८०० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. स्वेरीतील टेक्नो-सोसायटल च्या शोधनिबंधाना आंतरराष्ट्रीय ‘स्कोपस’ चा दर्जाही प्राप्त झाला आहे. याच संशोधनाच्या माध्यमातून अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाशी संबंधित सुमारे ४४ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झाली असून ४७ पेटंट्स देखील दाखल करण्यात आले आहेत. गेली सलग दोन वर्षे स्वेरीतील सर्व अभ्यासक्रमांना १००% प्रवेश झाले आहेत. स्वेरी मध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सोई सुविधांसह फ्लड लाईट सुविधा असणारे सुमारे चार एकरांचे भव्य क्रीडांगण आहे. सांस्कृतिक क्षेत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आवश्यक सुविधा व उपक्रम स्वेरीने राबविले आहेत. आतापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे तीन वेळा यशस्वी आयोजन महाविद्यालयाने करून दाखवले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात तसेच वारीकालात सेवा देण्याचे भरीव काम महाविद्यालयाकडून दरवर्षी होते. या सर्व बाबींमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जामध्ये भर पडली आहे. आज अमेरिकेतील एक विद्यार्थी स्वेरीमध्ये संशोधन कार्य करत आहे. महाविद्यालयास नॅक सोबतच टी.सी.एस (टाटा कल्संटन्सी सर्विसेस), आय.ई.आय. (इन्स्टिटयूशन इंजिनिअर्स ऑफ इंडिया) तसेच आय.एस.ओ. ९००१:२०१५ व यु.जी.सी.चे २ एफ व १२ बी प्रमाणपत्र मिळाले आहे तसेच अकॅडेमिक अँड अडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट मध्ये स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘ए प्लस प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व आय.क्यू.ए.सी. व स्वायत्तता समन्वयक डॉ. संदीप वांगीकर, कॅम्पस इन चार्ज डॉ. एम.एम. पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, स्वेरी परिवारातील व अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा दर्जा प्राप्त करण्यासाठी परिश्रम घेतले. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले. कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर, कल्चर, कॅम्पस प्लेसमेंट, अल्पावधीत निर्माण झालेले संशोधनाचे वातावरण, विद्यापीठात सर्वोच्चस्थानी असलेले शैक्षणिक निकाल आणि याच्या पंक्तीला ‘नॅक’ चे ‘ए प्लस’ हे मानांकन आणि त्यायोगे मिळालेली स्वायत्तता यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्गात देखील आनंदाचे, उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com