श्री विठ्ठल मंदिर मंदिर समिती मार्फत लाडू प्रसादाची निर्मिती
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने श्रींचा प्रसाद म्हणून भाविकांना बुंदी लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. सदरचा बुंदी लाडूप्रसाद विहित प्रक्रिया राबवून आऊटसोर्सिंग पध्दतीने दि यशोधरा महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या, नाशिक यांचेकडून खरेदी करण्यात येत होता. रिफाईड शेंगदाणा तेलातील बुंदी लाडूप्रसाद (एक लाडू प्रति 70 ग्रॅंम याप्रमाणे दोन लाडूचे लेबलसह कागदी पॅकेट) प्रति पॅकेट रू.12.50/- प्रमाणे दि.01/07/2022 पासून तीन वर्षासाठी ठेका मंजुर करण्यात आला होता. तथापि, सदर ठेकेदाराने करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केला होता. याशिवाय, अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार कार्यवाही न करणे, लाडूप्रसादामध्ये ड्रायफुटचा समावेश न करणे, चांगल्या दर्जाचा व मागणीनुसार लाडूप्रसाद न पुरवठा करणे, कमी दर्जाच्या तेलाचा वापर करणे. कमी वजनाचा, को-या पाकीटावर लाडूप्रसाद पुरवठा करीत असल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यांची रू.22.50/- लक्ष इतकी अनामत मंदिर समितीकडे जमा करून घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत, मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामधून दि.12/04/2023 ते दि.31/10/2023 या कालावधीत 35 लक्ष लाडू प्रसादाची विक्री झाली आहे, यामधून 3.50 कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले असून, 2.40 कोटी खर्च झाला आहे. भाविकांना चांगल्या दर्जाचा व गुणवत्तेचा तसेच पुरेसा प्रमाणात लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वारकरी भाविकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न मंदिर समितीने केला आहे. वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ही मंदिर समिती कार्य तत्पर असल्याचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. त्या अनुषंगाने आज एमटीडीसी भक्त निवास येथील बुंदी लाडू प्रसाद उत्पादन केंद्राची पहाणी केली. याप्रसंगी सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. येणारा प्रत्येक भाविक माय बाप विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूप्रसाद खरेदी करीत आहे. त्यासाठी पश्चिमद्वार व उत्तरद्वार येथे सकाळी 6.00 ते रात्री 10.00 पर्यंत विक्री स्टॉल सुरू ठेवण्यात आले असून, MTDC भक्तनिवास येथील उत्पादन केंद्रात लाडू बनविण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी सेवा करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना कॅप, ॲप्रोन व वैयक्तिक स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. या लाडुसाठी डबल refined शेंगदाणा तेल, तुकडा काजू, बेदाणा, कोरडी हरभरा डाळ, सुपर एस साखर, वेलदोडे, रंग इत्यादीचा वापर करून लाडू प्रसाद तयार होत असून, सद्य:स्थितीत केवळ भाविकांना गुणवत्तापूर्ण लाडू प्रसाद उपलब्धिवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कामी आवश्यक कच्चा माल खरेदीच्या सर्व निविदा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आऊटसोर्सिंग पध्दतीने घेण्यात येणा-या लाडूप्रसादाबाबत सन 2021-22 (तपासणी वर्ष 2022-23) या वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये काही आक्षेप आले होते. सदरचा लेखापरीक्षण अहवाल पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 मधील तरतुदीनुसार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशनात विधानमंडळाचे दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला आहे. तथापि, लेखा परिक्षकाने अहवाल सादर करण्यापूर्वीच म्हणजे दि.15/02/2023 रोजीच्या सभेत आऊटसोर्सिंग पध्दतीचा ठेका रद्द करून मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना दि.12/04/2023 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे. या कामी अनुभवी कर्मचारी श्री पृथ्वीराज राऊत यांना लाडू प्रसाद विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. लाडूप्रसादाच्या गुणवत्तेबाबत मंदिर समिती कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, वारकरी भाविकांचे हित जोपासण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com