माणसांचे जगणे हिच माझ्या साहित्याची प्रेरणा होय :- सीताराम सावंत
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर – “समाज जीवनातील विदारक परिस्थितीमुळे मन अस्वस्थ होते. सामाजिक प्रश्नांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता मी साहित्यातून मांडत राहतो. माझ्या कथा आणि कादंबरीतून माणदेशातील प्रदेशाचे चित्रण येते. माणदेशातील चालती बोलती माणसे ही माझ्या साहित्यातील व्यक्तिरेखा आहेत. माणसांचे जगणे आणि त्यांचा संघर्ष ही माझ्या साहित्याची प्रेरणा आहेत.” असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक सीताराम सावंत यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित ‘साहित्याची निर्मिती प्रक्रिया’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
सीताराम सावंत पुढे म्हणाले की, “महिमानगड आणि माण परिसरातील दुष्काळी परिस्थितीमुळे तेथील लोकांचे झालेले स्थलांतर विविध समस्यांना कारणीभूत ठरले त्याचा परिणाम म्हणून अनेक शाळांमधील तुकड्या बंद झाल्या. याचे वर्णन ‘देशोधडी’ या कादंबरीत आलेले आहे. तर कराड परिसरातील काळी कसदार जमीन बांधकाम व्यवसायिकांच्या घशात गेली. त्यावर मोठ मोठ्या इमारती उभारल्या गेल्या. त्या जमिनीवर येथून पुढे कधीही पिके उगवणार नाहीत. या जमिनीने गेल्या अनेक वर्षापासून कित्येकांची भूक भागविली. सर्जनशीलता हा त्या भूमीचा मूळ असणारा गुणधर्म यापुढे नष्ट केला जाईल. ही भावना ‘भुई भुई ठाव दे’ या कादंबरीत आली आहे. वर्तमानपत्रातून घेण्यात आलेल्या कथा स्पर्धांनी मला लिहिते केले.” अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “इतर भाषेच्या अतिक्रमणामुळे मराठी भाषेवर परिणाम होतो आहे. मराठीचा सातत्याने ध्यास घेवून साहित्याची निर्मिती अनेकजण करतात. माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेतून कथा निर्माण होवू शकते. समाजातील अनेक प्रश्न साहित्यातून हाताळले जातात. तेंव्हा साहित्य हे माणसाच्या मनाची आणि मेंदूची मशागत करते म्हणून साहित्याचे वाचन आपण केले पाहिजे. पुढच्या पिढीला समृद्ध भाषेचा आणि संस्कृतीचा वारसा बहाल करण्यासाठी त्याचे संवर्धन होणे अपेक्षित आहे.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला. या कार्यक्रमास कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, शास्त्र विभागाचे उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. अनिल चोपडे, डॉ. अमर कांबळे, पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे, सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. हरभजन कांबळे, डॉ. सुमित साळुंखे, प्रा. राजेंद्र मोरे, अभिजित जाधव, सुरेश मोहिते, ओंकार नेहतराव यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले.