स्त्रियांचा सन्मान अखंड रहावा :- सेवानिवृत्त प्राचार्या प्रा.डॉ. मीरा शेंडगे
पंढरपूर प्रतिनिधी
स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरापंढरपूर- ‘यत्र तु नार्यः पूज्यन्ते, तत्र देवताः रमन्ते’ अर्थात ‘जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवता वास करते.’असे म्हटले जाते. सध्या खूपदा स्त्रियांचे रूप हे कळसुत्री बाहुलीप्रमाणे आहे असे जाणवते पण परिवर्तन हा देखील निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे थोर महापुरुष जन्माला येतात आणि संपूर्ण चित्र बदलवतात. महापुरुषांच्या विचाराने प्रेरीत होवून समाजात स्त्रियांबद्दल संवेदना आणि सुधारणेचे वारे वाहू लागते. आज जो स्त्रियांना मानसन्मान मिळतो त्याचे खरे श्रेय आपल्या समाजातील महापुरुषांना जाते. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना पुढे योग्य मानसन्मान मिळवून दिला. त्यामुळे स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याचे, शिक्षित करण्याचे कार्य खऱ्या अर्थाने त्यांनी केले. त्यांना बळ देण्याचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. प्रत्येक स्त्रीला समाजामध्ये सन्मानाने वागवणे हे पुरुषांच्या मनात असणे महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या प्रगतीमध्ये पुरुषांचा सहभाग असणे आवश्यक आहे. यासाठी स्त्रियांचा सन्मान केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता अखंड राहावा.’ असे प्रतिपादन कुचन प्रशालेच्या सेवानिवृत्त प्राचार्या व जेष्ठ रंगकर्मी डॉ. मीरा शेंडगे यांनी केले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुटमध्ये संस्थेचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून कुचन प्रशालेच्या सेवानिवृत्त प्राचार्या व जेष्ठ रंगकर्मी डॉ. मीरा शेंडगे हया मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. शेंडगे यांनी संदेश फलकाद्वारे ‘स्त्रीचा सन्मान हाच आपला सुसंस्कार’ हा संदेश दिला. पुढे सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. शेंडगे म्हणाल्या की, ‘खरंतर स्त्रियांना सहानुभूतीची गरज नसते पण वर्तमान पत्रे वाचल्यास, सामाजिक संस्थांचे अहवाल पाहिल्यास समाजातील अनेक स्त्रिया हया अन्याय अत्याचाराला बळी पडत असल्याचे दिसून येते. यासाठी स्त्री व पुरुषातील मानसिक अंतर कमी होणे गरजेचे आहे. जर देशाच्या प्रगतीचा दर्जा सुधारायचा असेल अथवा वाढवायचा असेल तर देशातील स्त्रियांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. यासाठी स्त्रियांसाठी असलेली आर्थिक गुंतवणूक वाढवली पाहिजे. स्त्री ही अधिकारी असली तरी घरी आल्यावर ती एक संसारिक स्त्री होते यामुळे तिच्यावरील जबाबदारी वाढते. तेंव्हा तिला माणूस म्हणून जगताना अनंत अडचणी येतात. यातूनही ती उत्तमपणे जबाबदारी पार पाडते. यासाठी स्त्रीकडे पाहताना सरस्वती, कालीमाता, लक्ष्मी, आदिशक्ती या रूपामध्ये पाहणे गरजेचे आहे त्यामुळे स्त्रियांचा निर्णय घेताना आत्मविश्वास वाढेल. तसेच स्त्रियांनी देखील स्वतःला कमी लेखू नये.’ असे सांगून महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजा राममोहन रॉय यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबत दिलेल्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.प्रशांत पवार म्हणाले की ‘स्त्री समानता, स्त्री स्वातंत्रता हे बोलण्याऐवजी प्रथम कृतीद्वारे सिद्ध करणे आवश्यक आहे. मी कॉलेजकडे येताना पाहतो की ग्रामीण महिलांचे हाल होत असतात. त्यांच्यात भेदभाव होत असल्याचे जाणवते. यातून जर पुरुषांनी आपली मानसिकता बदलली तरच खऱ्या अर्थाने स्त्रीची प्रगती शक्य आहे. तसेच स्त्रियांनी देखील ‘रोटी, कपडा और मकान’ यांच्या चाकोरी बाहेर पडणे गरजेचे आहे.’ यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या परीक्षेत राज्यात प्रथम, विविध विषयात प्रथम, पैकीच्या पैकी गुण, क्रीडा व सांस्कृतिक विभागात विजेते, उपविजेते अशा तब्बल ३०१ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. एकूण सात लाख चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास रुपयांची बक्षिसे डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या या गुणवंत विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. यावेळी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्यासह अभियांत्रिकी व फार्मसीचे पदवी व पदविका महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. अजिंक्य पारडे, ओम कलुबर्मे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थिनी सचिवा राजनंदिनी पाटील यांनी आभार मानले.
स्वेरीत ‘जागतिक महिला दिना’ प्रसंगी डावीकडून डॉ. यशपाल खेडकर, डॉ.प्रशांत पवार, विद्यार्थिनी, राजनंदिनी पाटील, प्रा. एस.व्ही.मांडवे, कुचन प्रशालेच्या सेवानिवृत्त प्राचार्या व जेष्ठ रंगकर्मी डॉ. मीरा शेंडगे, डॉ. मिनाक्षी पवार, डॉ.दीप्ती तंबोळी, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मनियार व समोर उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*