महाराष्ट्रविशेष

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी, शासन निर्णय जारी

24 मराठी न्यूज मुख्य संपादक श्री लखन साळुंखे

राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई, हवालदार आणि सहायक पोलीस उप निरीक्षक यांना होईल. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.
या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल.
या शिवाय पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप निरीक्षक या पदोन्नती साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे.
यामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलीस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58, पोलीस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलीस उप‍ निरीक्षकांची पदे 17 हजार 71 इतकी वाढतील.

या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गातील पदांच्या वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल. त्याचबरोबर पोलीस दलात किमान 30 वर्षे सेवा पूर्ण झालेले आणि सहायक पोलीस
उप निरीक्षक
या पदावर 3 वर्षे सेवा
पूर्ण झालेले त्याचप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उप निरीक्षकांचे वेतन घेत असलेले अशा तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या अंमलदारांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक (ग्रेड पी.एस.आय.) असे संबोधण्यात येईल. या अधिकाऱ्यांना नाशिक येथे 12 आठवड्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये घ्यावे लागेल.

बढतीची दीर्घ प्रतिक्षा आता संपली

सध्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक- पोलीस हवालदार-सहायक पोलीस उप निरीक्षक या तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात.
तसेच तुलनेने पदोन्नतीची पदे कमी असल्याने अपेक्षेपेक्षा पदोन्नतीस जास्त कालावधी लागत असल्याने
कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होवून कार्यक्षमतेवर विपरित परिणाम दिसून येतो. सहायक पोलीस उप निरीक्षक या पदावर 3 वर्षे सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. मात्र या निर्णयामुळे पोलीस दलातील अंमलदारांना पदोन्नतीचा मोठा लाभ होणार आहे.

गुन्हे रोखण्यासाठी मोठी मदत

या निर्णयामुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने
गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरीकांना मदत घेण्यास अधिक सुलभता येईल.
पोलीस दलाची प्रतिमा त्यामुळे सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच पोलीस दलास सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरिता मिळणाऱ्या मनुष्य दिवसांमध्ये मोठी वाढ होईल आणि गुन्हे उघडकीस येण्याच्या व रोखण्याच्या प्रमाणामध्ये देखील भरीव वाढ होणार आहे

Date-26-02-2022
संपादक,

/ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!