शैक्षणिक

मुंढेवाडी मध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे ‘विशेष श्रमसंस्कार शिबीर’ संपन्न

पंढरपूर तालुका प्रतिनिधी

पंढरपूर– ‘प्रत्येकानी आपले अंगण स्वच्छ ठेवले तर गल्ली, गाव, तालुका, जिल्हा व राज्यासह अवघा देश आपोआप स्वच्छ होईल. अर्थात ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा देखील विकास होईल. आपल्यासारख्या युवकांच्या शक्तीमुळेच आज भारत देश विकासाच्या वाटेवर सातत्य राखत आहे. त्यामुळे राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचे खूप मोठे योगदान आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्कारांची सुरुवात ही ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होत असते. गावांमध्ये असलेली साक्षरता आणि गावच्या विकासामध्ये युवकांचे असलेले भरीव योगदान यामुळे या ‘विशेष श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्काराचे धडे घेऊन आपल्या अभियांत्रिकी मधील तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुदाम बापु मोरे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंढेवाडी (ता.पंढरपूर) येथे दि.२२ जानेवारी २०२४ पासून ते दि.२८ जानेवारी २०२४ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समारोप प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संचालक सुदाम मोरे हे मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रा. बी.टी.गडदे यांनी या तब्बल आठवडाभर चाललेल्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’ची सविस्तर माहिती देत आलेला अनुभव सांगितला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर जनजागृती केली. यामध्ये योगासने, सूर्यनमस्कार, श्रमदान, चर्चासत्र, प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच बालविवाह निर्मूलन, आरोग्य, स्वच्छता यावर मार्गदर्शन, वृक्षारोपण, वृक्ष सुशोभीकरण, ग्राम स्वच्छतेचे महत्व, मुली वाचवा देश वाचवा, प्लास्टिकबंदी, पाणी व्यवस्थापन, शैक्षणिक प्रबोधन, शिक्षणाची गरज व महत्व, लहान मुलांचे हक्क व सुरक्षितता या संबंधित मार्गदर्शनपर विविध कार्यक्रम व ग्रामस्वच्छता विषयक विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संचालक सुदाम बापु मोरे पुढे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेल्या कलागुणांचा उपयोग समाजाच्या व ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी करावा.’ असे म्हणून स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या आठ दिवसाच्या सहवासातील अनुभव सांगितले. स्वेरीच्या रासेयोचे सल्लागार डॉ.रंगनाथ हरिदास यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पार पडलेल्या ‘विशेष श्रम संस्कार शिबिरा’ चे महत्व विशद केले त्याचबरोबर ‘महिलांच्या आरोग्य समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर पंढरपूर पंचक्रोशीत अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या डॉ. बी.पी.रोंगे हॉस्पिटल तर्फे स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांचे व्याख्यान, प्रा. सचिन गवळी यांनी वृक्ष लागवड, पत्रकार पूजा खपाले यांचे ‘अंधश्रद्धा व बालविवाह निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान, रासेयो चे पंढरपुर विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले यांनी ‘रासेयो कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली तसेच स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनात्मक पथनाट्यातून समाज प्रबोधन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या शिबिरात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.एस. चौधरी, प्रा.जी.जी. फलमारी, प्रा.एम.ए.सोनटक्के, प्रा.पी.व्ही.पडवळे, प्रा.एस.बी.खडके यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग व अभियांत्रिकीतील रासेयोचे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी व मुंढेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमासाठी मुंढेवाडी ग्रामस्थांनी देखील खूप मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.एम.आवताडे यांनी केले तर रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एस.साठे यांनी आभार मानले.

मुंढेवाडीमध्ये रासेयो अंतर्गत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘विशेष श्रम संस्कार’ शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना स्वेरीच्या रासेयोचे सल्लागार डॉ.रंगनाथ हरिदास सोबत रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस. साठे, श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुदाम बापु मोरे व शिवाजी मोरे, इतर मान्यवर तसेच मुंढेवाडी गाव स्वच्छ करताना स्वेरीचे विद्यार्थी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!