सिनेमा आणि नाटक ही आव्हानात्मक क्षेत्रे ग्रामीण विद्यार्थी सहज पेलू शकतात – अभिनेते मकरंद पाध्ये
पंढरपूर – प्रतिनिधी
“कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोर, गरीब, वंचित आणि उपेक्षितांच्या मुलांसाठी ज्या उद्देशाने शाळा सुरु केली. तो उद्देश आज सफल होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये असतात, त्यांची संघर्षाची तयारी असते, त्यांच्यामध्ये सुप्त कलागुण असतात, विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता अभिनयाच्या क्षेत्रात उडी घेतली पाहिजे. सिनेमा आणि नाटक ही आव्हानात्मक क्षेत्रे असली तरी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी ती लीलया स्वीकारू शकतील” असे प्रतिपादन धर्मवीर चित्रपटातील अभिनेते मकरंद पाध्ये यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत मराठी विभाग व कामाक्षी क्रिएटिव्ह मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. मकरंद पाध्ये पुढे म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नाटक या कला प्रकारावर पाच दिवसाची कार्यशाळा घेते आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. आपला विद्यार्थी घडावा. त्यांच्यात प्रात्यक्षिक स्वरुपात कौशल्ये विकसित करावीत. ही भूमिका अभिमानास्पद आहे. महानगरातील महाविद्यालयातून अशा स्वरूपाच्या कार्यशाळा घेतल्या जात नाहीत. शहरातील विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाच्या संधी शोधाव्या लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा सदुपयोग करून घ्यावा.” अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “पंढरपूर क्षेत्राला सांस्कृतिक वारसा आहे. त्यामध्ये भर घालण्याचे काम महाविद्यालय करत आहे. सध्या अतिशय वेगाने समाज जीवनात बदल घडत आहेत. त्यामुळे मुल्ये जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कलेच्या माध्यमातून समाजातील संस्कृतीची जोपासना करता येते. विद्यार्थ्यांनी कलांची जोपासना केली तर त्यांना आनंदी जीवन जगता येईल या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय राकेश तळगावकर यांनी करून दिला. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी उमेश घळसासी, डॉ. सोमनाथ सोनवलकर, आकाश भडसावळे, निलम चव्हाण, शांताराम सावंत आदी तज्ज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, प्रा. हरिभजन कांबळे, प्रा. उज्ज्वला शिंदे, डॉ. बापूसाहेब घोडके, डॉ. सुमित साळुंखे व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी मानले.