स्वेरी मध्ये ‘नॅशनल एनर्जी कंझर्वेशन विक’ साजरा
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर- ‘विजेची बचत करणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी असल्यामुळे नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. परंतु, प्रत्येकाने जर घरामध्ये विजेचा वापर करताना काळजी घेतली तर भविष्यात भरपूर विजेची बचत होऊ शकते. घरातील सर्वच सदस्यांनी वीज बचतीसाठी पुढाकार घेतला तर वीज बचत होईलच, शिवाय येणारे विजबील देखील कमी येईल. ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ आपल्याला ऊर्जा काळजीपूर्वक वापरण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडवण्याची सामूहिक जबाबदारी लक्षात आणून देतो. यासाठी उर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे.’ असे प्रतिपादन पुण्यातील मॅनेजमेंट कन्सल्टंट मा. सुनील दोशी यांनी केले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व आय.आय.सी. तथा ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’ यांच्या संयुक्त विद्यमाने व ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया’ आय.ई.आय., सोलापूर लोकल सेंटर च्या सहकार्याने दि.१४ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान ‘नॅशनल एनर्जी कंझर्वेशन विक (राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह) साजरा करण्यात आला. या प्रसंगी ‘पॉवरिंग द फ्युचर: द रोल ऑफ एनर्जी कंजर्वेशन टुडे’ या विषयावर भविष्यात उर्जेची बचत कशी करता येईल यावर पुण्यातील मॅनेजमेंट कन्सल्टंट मा. सुनील दोशी हे बहुमोल मार्गदर्शन करत होते. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दिपप्रज्वलनानंतर इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए. तंबोळी यांनी प्रास्ताविकात या उर्जा बचत सप्ताहाचे महत्व स्पष्ट केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगीतली. उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार म्हणाल्या कि, ‘शाश्वत भविष्यासाठी विजेची बचत करणे आवश्यक आहे. विजेची बचत करण्याची सुरवात आपल्यापासून व्हावी. अकारण ट्यूब, बल्ब, पंखे लावू नयेत. ज्या ठिकाणी कोणीही नाहीत अशा ठिकाणी विजेवरील उपकरणे चालू असतील तर ती त्वरित बंद करावीत.’ असे सांगून भविष्यात विजेच्या वापराबाबत गंभीरता आवश्यक आहे हे स्पष्ट केले. यावेळी पाहुण्यांनी विजेची बचत, अकारण वाया जाणारी वीज कशी वाचवता येईल यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘विजेची बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या विद्युत उपकरणांची संख्या कमी करणे, जास्त क्षमतेच्या उपकरणा ऐवजी कमी क्षमतेची व उत्तम दर्जाची उपकरणे वापरावी. यामुळे वीज बचत होऊ शकते.’ यासाठी डॉ. बादलकुमार यांनी सर्व कर्मचारी सदस्यांना ‘ऊर्जा संवर्धना’साठी शपथ दिली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वीज बचतीची व संवर्धनाची जनजागृती व्हावी यासाठी ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ हा स्पर्धात्मक उपक्रम राबवण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे डॉ.पी. आर. कुलकर्णी, प्रशासन अधिष्ठाता डॉ.एम.पी.ठाकरे, आय.आय.सी.चे प्रेसिडेंट प्रा.दिग्विजय रोंगे, डॉ. बादलकुमार यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आर. एल. खांडेभराड यांनी करून सर्वांचे आभार मानले.