स्वेरीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम सुरु
अभियांत्रिकी, फार्मसी ग्रंथालयात होतेय नियमित वाचन
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर- अलीकडील ‘सोशल मीडिया’ मुळे सध्याची तरुणाई ‘वाचन संस्कृती’ कडे दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवत आहे त्यामुळे भविष्यकाळ अंधारमय होण्याची चिन्हे दिसत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या वतीने दि. ०१ जानेवारी ते दि. १५ जानेवारी २०२५ या पंधरवड्यामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यभरातील महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक वाचनालये या ठिकाणी राबवण्याचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभर पुन्हा तरुण वर्ग वाचनाकडे वळल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या आदेशाने व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या सूचनेनुसार गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या पदवी, पदविका महाविद्यालयांमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम उत्साहाने राबविण्यात येत आहे.‘वाचन संस्कृती’ मुळे तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण प्रगती होते. सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण ‘वाचन संस्कृती’पासून अलिप्त होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘वाचन संस्कृती’ वाढवण्यासाठी हा उदात्त उपक्रम राबवण्याचा संकल्प शासनाने केला. विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये यांमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे स्वेरीत स्वागत करण्यात आले. दि.१ जानेवारी २०२५ रोजी स्वेरी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मराठी विषयाचे विभागप्रमुख डॉ. रमेश शिंदे यांच्या हस्ते ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी वाचनाचे फायदे व सध्या वाचन संस्कृती राबविणे का गरजेचे आहे, हे पटवून दिले. हा उपक्रम दि. १५ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या पदवी, पदविका महाविद्यालये, ग्रंथालये, तसेच वसतिगृहांमध्ये ‘नाईट स्टडी’च्या माध्यमातून विद्यार्थी वाचन करत आहेत. शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती, दोन्ही महाविद्यालयांतील विभागांचे प्रमुख, वर्गशिक्षक, ग्रंथालय प्रमुख सतीश बागल, बी. फार्मसी ग्रंथालय प्रमुख धनाजी पोरे तसेच ग्रंथालयातील कर्मचारी अमोल रोंगे, सतीश अनपट व इतर कर्मचारी हे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून प्रा.सुजित इनामदार हे काम पहात आहेत. या संपूर्ण पंधरवड्यामध्ये चारही महाविद्यालयात, ग्रंथालयात विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे वाचन करत असल्याचे दिसून येत आहे.
स्वेरीच्या इंजिनिअरिंग व फार्मसी मध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविला जात आहे या प्रसंगी दोन्ही महाविद्यालयातील वाचन करत असतानाचे छायाचित्र.