पर्यटन स्थळी घोड्यांना काटेरीलगाम,घोडेवाल्यांकडून १०४ काटेरी लगाम जप्त
24 मराठी न्यूज पुणे प्रतिनिधी श्री बबनराव शिरसागर
पुणे : पर्यटकांना रपेट मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घोड्यांना काटेरी लगाम घालण्याचा वापर पर्यटनस्थळांवर करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर ‘पेटा’ (पीपल फॅार द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल्स) संस्था तसेच पोलिसांकडून पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरात कारवाई करण्यात आली.
घोडेवाल्यांकडून १०४ काटेरी लगाम जप्त करण्यात आले. ‘पेटा’कडून घोडेवाल्यांना साधे लगाम देण्यात आले.घोड्यांना काटेरी लगाम घालण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापुरातील रंकाळा तलाव, पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील घोड्यांवरून पर्यटकांना रपेट मारणारे व्यावसायिक काटेरी लगामचा (स्पाईक बिट) वापर करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘पेटा’च्या नताशा इत्तिवेराह, सांगलीतील प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे सुनील हवालदार आणि स्वयंसेवकांनी या प्रकाराची माहिती पोलीस तसेच प्रादेशिक पशूसंवर्धन सहआयुक्त डॅा. पी. डी. कांबळे (मुंबई विभाग), पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॅा. शीतलकुमार मुकणे, पशूधन विकास अधिकारी प्रियंका जोपूळकर (पुणे), डॅा. वाय. बी. पठाण (कोल्हापूर) डॅा. रत्नाकर काळे (रायगड ) यांना दिली.त्यानंतर स्वयंसेवकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान, रंकाळा तलाव परिसरातील घोड्यांना वापरण्यात येणारे काटेरी लगाम काढून टाकले.
या कारवाईत एकूण १०४ काटेरी लगाम जप्त करण्यात आले. घोड्यांचा मालकांना विनामूल्य साधे लगाम वापरण्यास देण्यात आल्याचे नताशा इत्तेवेराह आणि सुनील हवालदार यांनी सांगितले. आसाम, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, उत्तरप्रदेशासह अनेक राज्यात काटेरी लगामाचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. काटेरी लगाम तयार करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणे गरजेचे आहे. काटेरी लगामचा वापर करण्यास देशपातळीवर बंदी घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१