आपले वर्तन प्रेमळ व सामान्य असावे -प्रशिक्षिका सौ. संस्कृती सातपुते

पंढरपूर तालुका प्रतिनिधी
स्वेरीत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ प्रशिक्षणाचे उदघाटनपंढरपूर- ‘आपल्या समोरचा व्यक्ती संभाषण करताना कसाही असो परंतु आपण त्याच्या सोबत जर आत्मीयतेने, तन्मयतेने, भावनेने आणि प्रेमाने वर्तन केले तर समोरच्या व्यक्तीची मानसिकता बदलू शकते. त्यामुळे आपसातील संबंध आणखी मजबूत होतात. कालांतराने आपल्याला सहज, मजेत घेणारा व्यक्ती पुढे आपल्याशी आत्मीयतेने वर्तन करत असल्याचे जाणवते कारण आपले अज्ञात शत्रू आपल्यावर नेहमी हल्ला करत असतात. अशावेळी आपण संयमाने, अभ्यासपूर्वक, प्रेमभाव व नम्रपणे वर्तन करावे. त्याचा पुढे सकारात्मक परिणाम जाणवतो. यासाठी आपले वर्तन नेहमी प्रेमळ व सामान्य असावे.’ असे प्रतिपादन रामसोल टेक आयटी कंपनीच्या डायरेक्टर व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रशिक्षिका सौ. संस्कृती सातपुते यांनी केले गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम तथा एफडीपी अंतर्गत दि.२८ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आठवडाभर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. याच्या उदघाटन प्रसंगी माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी, रामसोल टेक आयटी कंपनीच्या डायरेक्टर, उर्जा फौंडेशनच्या अध्यक्षा, कवियत्री, लेखिका व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रशिक्षिका सौ. संस्कृती सातपुते हया मार्गदर्शन करत होत्या. प्रारंभी इनोव्हेशन सेलच्या स्वेरीच्या समन्वयक डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी स्वेरीच्या खडतर वाटचालीबाबत आणि त्यातून मिळालेल्या उत्तुंग यशाचा सविस्तर लेखाजोखा सादर केला. पुढे बोलताना प्रशिक्षिका सौ. सातपुते म्हणाल्या की, ‘स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये देखील नम्रपणा जाणवतो. सामाजिक उपक्रमात वेगवेगळे प्रयोग करताना केवळ अभियंतेच बाहेर पडत नाहीत तर देशाचे जबाबदार नागरिक बाहेर पडतात. खरोखर स्वेरीच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाचे कौतुक वाटते. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच स्वेरी सामाजिक उपक्रमात देखील हिरीरीने सहभागी होते. हेच मुल्यांकित शिक्षण सध्या अत्यंत महत्वाचे आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच कोणतेही सामाजिक कार्य असो स्वेरी आत्मीयतेने करत असताना दिसते. धकाधकीच्या जीवनात साहजिकच ओढाताण होत असते. यासाठी स्वेरीने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे प्रशिक्षण ठेवले आहे. डॉ. रोंगे सरांचा हा निर्णय स्वागतार्ह असून स्वेरी योग्य वेळी योग्य शिक्षण देत असते. ‘शिक्षणाला प्रशिक्षणाची जोड असेल तर माणूस घडतो’ हे डॉ. रोंगे सरांच्या स्वागतार्ह विचारांचे सर्वत्र अनुकरण करणे गरजेचे आहे. विद्यार्थी तर स्वेरीत घडतातच परंतु शिक्षकांना देखील ज्ञानदान करताना अधिक उर्जा येईल यासाठी डॉ. रोंगे सरांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्याचाच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हा एक भाग आहे. मानवाला शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप आणि नियमित प्राणायम केल्यास आरोग्य उत्तम राहते.’ असे सांगून त्यांनी जीवन उत्तमपणे जगण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा फायदा कसा होतो हे सांगितले. या आठ दिवसात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या विविध अनुयायांकडून योगासने व आरोग्याबाबत मार्गदर्शन सत्र होणार आहे. सकाळच्या सत्रात विद्यार्थी व सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. यावेळी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे अनुयायी हर्षल सावे, प्रतिक खंडेलवाल, प्रेरणा खंडेलवाल यांच्यासह इतर अनुयायी तसेच स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, एफ. डी. पी. च्या समन्वयक प्रा. मिनल भोरे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ.एन.पी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

स्वेरीमध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या रामसोल टेक आयटी कंपनीच्या रामसोल टेक आयटी कंपनीच्या डायरेक्टर व आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रशिक्षिका सौ. संस्कृती सातपुते सोबत डावीकडून डॉ. प्रशांत पवार, अनुयायी हर्षल सावे, प्रेरणा खंडेलवाल, सौ. संस्कृती सातपुते, प्रतिक खंडेलवाल व युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षिका सौ. संस्कृती सातपुते.
