मधमाशीपालन व्यवसाय शाश्वत विकासासाठी आवश्यक – ध्रुवकुमार बनसोडे
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर:- “शाश्वत विकासासाठी मधमाशीपालन व्यवसाय अत्यंत आवश्यक आहे. शेती क्षेत्रातून भरगोस उत्पादन मिळविण्यासाठी परागीभवन गरजेचे असते ते काम मधमाशा सहजपणे करतात. म्हणूनच या व्यवसायासाठीची आवश्यक कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी”, असे मत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सोलापूर येथील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या, कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) योजनेंतर्गत ‘महाविद्यालयीन प्राध्यापकासाठी व विद्यार्थ्यांसाठी’ आयोजित ‘मधमाशीपालन’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ध्रुवकुमार बनसोडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, रुसा समन्वयक प्रा. योगेश पाठक, डॉ. चंद्रकांत काळे, प्रा. रेश्मा माने, डॉ. अमर कांबळे, डॉ. अमोल मामलाय्या, डॉ. शिल्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ध्रुवकुमार बनसोडे यांनी यावेळी महाबळेश्वर येथे असलेल्या केंद्राविषयी माहिती दिली. तसेच शासनाकडून सुरु असलेल्या विविध योजनाची माहिती दिली. त्यामध्ये मधकेंद्र योजनेवर विस्तृत प्रकाश टाकला. सदर केंद्राकडून मोफत प्रशिक्षण, आवश्यक साहित्य व विद्यावेतन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रथम सत्रामध्ये मधुक्षेत्रिक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सोलापूर, प्रभाकर पलवेंचा यांनी मधमाशीच्या जाती, त्यांची पोळ्याची रचना, मध तयार होण्याची प्रक्रिया, परागीभवनाचा कोणत्या पिकांना फायदा होतो यावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रामध्ये चाकूर येथील व्यावसायिक दिनकर पाटील यांनी मधमाशीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर कसा करावा व यामध्ये समाविष्ट असलेल्या शास्त्रीय बाबींवर मार्गदर्शन केले. या वेळी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एपिस मेलीफेरा या माशीची पेटी ठेवण्यात आली. सर्व सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्याना या माशा दाखविण्यात आल्या व त्या माशा हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. दुपारील सत्रात शुद्ध मध ओळखण्याची तंत्रे शिकविण्यात आली. तसेच सामुहिक पद्धतिने मधाची चवही चाखण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. त्यांनी महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अमोल मामलाय्या यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.एस. काळे व प्रा. कु, एस. आर. वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. हर्षदा चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासठी केतन अल्लापुरकर, प्रा. दिव्या गायकवाड, प्रा. कविता कुलकर्णी, प्रा. एस.ए. भोसले यांनी परिश्रम घेतले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.