स्टार्टअपच्या प्रेरणेतून भविष्यात आणखी उद्योजक निर्माण होतील :-व्हेंडाफोरएसच्या सीईओ सौ.स्मिता डुबल
पंढरपूर प्रतिनिधी
स्वेरीत ‘नॅशनल स्टार्टअप डे’ कार्यक्रम संपन्नपंढरपूर- ‘उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना सहवासातून व अनुभवातून आपल्या मनात नवनवीन संकल्पना निर्माण होत असतात. त्या संकल्पनांचे उत्पादनामध्ये रुपांतर करून तसेच आपल्या उत्पादनाचे जागतिक बाजार पेठेत सादरीकरण करून भविष्यात फायदे होऊ शकतात. ‘स्टार्टअप’चा होणारा फायदा समाजाच्या पसंतीस पडणे आवश्यक असते. त्यामुळे स्टार्टअपच्या प्रेरणेतून भविष्यात आणखी उद्योजक निर्माण होतील.’ असे प्रतिपादन व्हेंडाफोरएस च्या सीईओ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्मिता डुबल यांनी केले गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल मध्ये ‘नॅशनल स्टार्टअप डे’ आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हेंडाफोरएसच्या सीईओ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्मिता डुबल ह्या मार्गदर्शन करत होत्या. दीपप्रज्वलानंतर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी विद्यार्थी व श्रेयस पॉवर सोल्युशन्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेयस कुलकर्णी यांनी ‘आयडिया पासून ते स्टार्टअप पर्यंतचा प्रवास सांगताना म्हणाले की, ‘अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभा केल्यास भविष्यात खूप फायदा होतो व इतरांना देखील रोजगार देता येतो. माझ्या कंपनीसाठी सुरुवातीला प्रतिसाद न देणारे आता ते उत्तम भागीदार झाले असून ट्रान्सफॉर्मर क्षेत्रात आपला व्यवसाय उत्तम करत आहेत. स्वेरीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री मधून शिक्षण घेत असताना उत्तम मार्गदर्शन मिळाले. याच कारणामुळेच मला आज नोकरीपेक्षा उद्योगधंदा करण्याची आवड निर्माण झाली. आज वार्षिक टर्नओव्हर साडेचार कोटी रुपये पर्यंतचा आहे. कोणताही उद्योग यशस्वी होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम मात्र घ्यावे लागतात.’ असे सांगून उद्योजक होण्यासाठी भांडवल, संपर्क आणि आपल्या उद्योगाचे सादरीकरण, गुंतवणूक, वाहतूक व्यवस्था आदी बाबत महत्वाची माहिती दिली. श्रेयस पॉवर सोल्युशन्स कंपनीमध्ये सध्या १६ केव्हीए पासून ३२५ केव्हीए पर्यंत ट्रान्सफॉर्मर बनविले जातात व दुरुस्तीही केली जाते. म्हणून आपल्या मनातील संकल्पनांना वाव द्या. भावी उद्योजकांना माझे नेहमी सहकार्य राहील. तुम्ही हाक द्या, मी साथ देईन.’ असेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना सीईओ सौ.डुबल म्हणाल्या की, ‘स्टार्टअप डे’ हा उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी साजरा केला जातो
यासाठी आपल्यातील आयडीया आणि सकारात्मक विचारसरणी या बाबी उद्योग क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात.’ असे सांगून त्यांनी स्टार्टअप बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती दिली. सदरचा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख डॉ. एस.पी. पवार यांच्या नेतृत्वाखाली व स्वेरीच्या ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’चे अध्यक्ष प्रा. दिग्विजय डी. रोंगे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योजिका तृप्ती जाधव, स्वेरीचे संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने, प्रा.एस.एम. शिंदे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. पी.ए. सातारकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
स्वेरीमध्ये ‘नॅशनल स्टार्टअप डे’ चे उदघाटन करताना व्हेंडाफोरएस च्या सीईओ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्मिता डुबल सोबत डावीकडून प्रा.एस.एम. शिंदे, उद्योजक श्रेयस कुलकर्णी, डॉ.ए.पी.केने, उद्योजिका तृप्ती जाधव, सीईओ सौ.स्मिता डुबल, डॉ. एस.पी पवार तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्हेंडाफोरएस च्या सीईओ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्मिता डुबल.