पुणे : दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार : मंत्री चंद्रकांत पाटील
24 मराठी न्यूज पुणे प्रतिनिधी बबनराव क्षीरसागर
पुणे-राज्यशासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधील असून, इतर घटकांप्रमाणे दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत शासन विचार करत आहे.त्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.दिव्यांग मुलामुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, दिव्यांग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, श्री समर्थ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, शासनाने समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी विविध प्रयत्न केले आहेत.त्यातूनच इतर मागास बहुजन कल्याण विभाग, तसेच स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात दिव्यांगांतून चांगले खेळाडू घडावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दिव्यांंगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांतून दिव्यांगही कुठे कमी नाहीत, असा संदेश समाजासमोर आला आहे, यामुळे दिव्यांग मुलामुलींचे मनोबल वाढेल.अजित पवार म्हणाले, या स्पर्धांमुळे दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याबरोबरच त्यांना नवीन अनुभूती मिळाली आहे. अशा स्पर्धांतून राज्यपातळीवरचे खेळाडू तयार होऊन देशपातळीवर निश्चितच राज्याचे व देशाचे नाव उंचावतील. भविष्यात दिव्यांगांसाठी पॅरा ऑलिम्पिक गटातील स्पर्धा आयोजित करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७