जीवाला जीव देणारे मावळे हीच शिवाजी राजांची खरी शक्ती’ – डॉ. दत्तात्रय चौधरी.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर – “छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. मराठी, संस्कृत, पारसी, उर्ढू आणि इंग्रजी भाषांमध्ये शिवाजी महाराज यांचे चरित्र लेखन करण्यात आले. परकीय लेखकांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लेखन करताना त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त केलेली दिसते. इंग्रजलेखक ग्रॅन्ट डफ याने शिवाजी महाराजांचे पहिले चारित्र्य लेखन केले आहे. रयतेच्या प्रति असणारे प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा या बाबीशिवाजीराजांच्या व्यक्तीमत्त्वात होत्या, म्हणून ते खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन करू शकले. जीवाला जीव देणारे मावळे हीच शिवाजी राजांची खरी शक्ती होती.” असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्तमहाविद्यालयात इतिहास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, सांस्कृतिक विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त आयोजित व्याख्यान समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी पुढे म्हणाले की, “एका जहागीरदाराच्या मुलाने स्वराज्याचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरविले हीच शिवाजी महाराज यांच्या जीवनातील क्रांती होती. खेळण्या बागडण्याच्या वयात शिवाजी राजांनी राजकारणाचे धडे घेतले. मोघल सत्तेची असणारी ताकद लक्षात घेऊन त्यांनी गनिमी कावा हे युद्ध तंत्र विकसित केले. शेता शिवारातील लोकांना प्रत्यक्षात स्वराज्याच्या निर्मितीत सहभागी करून घेण्याचे कार्य त्यांनी केले. जीवाला जीव देणारी माणसे स्वराज्याच्या निर्मितीसाठी जोडण्याचे अद्वितीय कार्य त्यांनी केले. म्हणूनच जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जावून शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली तरच खऱ्या अर्थाने शिवाजीमहाराजांनी स्वराज्याचे पाहिलेले स्वप्न साकार होईल.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “रयतेचा विश्वास संपादन करण्यात शिवाजीराजे यशस्वी ठरले. स्त्रियांचा सन्मान करणे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे संरक्षण करणे. या दोन बाबी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला आधारभूत ठरल्या. निर्णय क्षमता, दूरदृष्टीपणा, धैर्य, चिकाटी, मुत्सदेगिरी, शौर्य, धाडस या बाबीत्यांच्या व्यक्तीमत्त्वातील वेगळेपण अधोरेखित करतात. लोकांच्या ठिकाणी असणारे गुणविशेष लक्षात घेऊन त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. त्यामुळेच ते आदर्शराजे ठरतात.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ अभ्यासकेंद्राचे समन्वयक डॉ. रविराज कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील गड आणि किल्ल्याच्या पोष्टरचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, विज्ञान विभाग अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे, कॅप्टन डॉ. समाधान माने, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षक प्रा. युवराज अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेरगायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. कल्याण वाटाणे यांनी मानले………………………………………………………………………………………………………………………………………….
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*